कोल्हार बुद्रुक (प्रतिनिधी): 
येथील एक्सपर्ट क्लासेसच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ 'हॉटेल फ्लेवर' येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मान्यवरांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण न घेता आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल तांबे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विनायक लाळे उपस्थित होते. व्यासपीठावर एक्सपर्ट क्लासेसचे संचालक योगेश होन, ईश्वर होन, शिक्षक संग्राम गोरे, सुयोग चिंधे, हर्षल निबे, राजश्री काळे, वर्षा भांड आणि साक्षी चिकणे यांची उपस्थिती होती. 

यावेळी मार्गदर्शन करताना अध्यक्ष राहुल तांबे यांनी विविध लोकप्रिय व्यक्तींच्या आवाजात विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आगळ्यावेगळ्या शैलीत शुभेच्छा दिल्या, ज्यामुळे वातावरण हलके-फुलके झाले. प्रमुख पाहुणे विनायक लाळे यांनी पुढील शिक्षणासाठी अभ्यासाची पातळी उंचावण्याचा कानमंत्र दिला. संचालक ईश्वर होन यांनी कठीण स्तरावरील शिक्षण घेणे का अनिवार्य आहे, हे अधोरेखित केले. योगेश होन यांनी इयत्ता ११ वी व १२ वी मधील वाढती स्पर्धा आणि त्यातील संधींबाबत सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. संग्राम गोरे यांनी गणिताचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले, तर सुयोग चिंधे यांनी बोर्ड परीक्षेच्या तांत्रिक तयारीबाबत सूचना दिल्या. हर्षल निबे यांनी विद्यार्थ्यांनी वैयक्तिक शिस्त कशी जोपासावी, यावर मार्गदर्शन केले. ​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनिष्का चौरे व आर्या जोशी यांनी केले. अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव कार्तिकी मुसमाडे हिने मांडला, तर त्यास जानवी कुंभकर्ण हिने अनुमोदन दिले. 

आपल्या मनोगतात आयुष मेनगर, राजन राजभोज, प्राची उंडे, सुप्रिया कडनोर, आचल रांधवणे आणि ईश्वरी घाडगे यांनी क्लासेसमधील आठवणींना उजाळा दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजश्री काळे, वर्षा भांड व साक्षी चिकणे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजनही करण्यात आले होते. सर्वांना स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post