कोल्हार वार्ताहर- (साईप्रसाद कुंभकर्ण )
कोरोना चा वाढता संसर्ग आणि प्रसार रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉक डाऊन मुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असून रोजगाराच्या अभावी हातावर पोट असलेल्या गोरगरीबांसाठी उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथील महाशिवरात्र महोत्सव समितीने या खडतर परिस्थितीत सामाजिक दायित्वाचे भान ठेवून गावातील ११४ गोरगरिब, वंचित आणि गरजूं लोकांना धान्य आणि किराणा सामानाचे घरपोच वाटप केले आहे.
लॉक डाऊन च्या बिकट परिस्थितीत मोलमजुरी करून हलाखीचे जीवन जगणाऱ्या गोरगरिबांसमोर पोट भरण्याची चिंता आणि उदरभरणाचे संकट निर्माण झाले आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत सहानुभूतीपूर्वक आणि सामाजिक दायित्वाच्या भावनेतून गावातील आपल्या गोरगरीब समाजबांधवांना दिलासा देण्यासाठी गावातील महाशिवरात्र महोत्सव समितीच्या तरुणांनी लोकवर्गणीतून संकलित झालेला निधी तसेच गावातील दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते दिलेली रोख रक्कम आणि जीवनावश्यक वस्तू स्वरूपातील अशा एकूण सुमारे ७० हजार रुपयांची रक्कम जमा केली. या रकमेतून खरेदी केलेल्या धान्य आणि तांदूळासह साखर, तेल, डाळ, मसाले अशा जीवनावश्यक किराणा वस्तूंच्या सामग्रीचे, महाशिवरात्र महोत्सव समितीच्या तरुणांनी गावचे स्वच्छतादूत म्हणून सेवा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना तसेच कोरोना योध्दा असणाऱ्या आशा सेविकांना वाटप केले. त्याचप्रमाणे गावातील अत्यंत गोरगरीब, गरजू आणि वंचित व्यक्तींना कोरोना च्या निर्बंध व नियमांचे पालन करुन घरोघर जाऊन जीवनावश्यक वस्तूंच्या सामग्रीचे वाटप केले. महाशिवरात्र महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये अध्यक्ष :अक्षय रवींद्र मोरे तसेच वैभव कोळपकर, अक्षय वादे, दिगंबर दळवी, यश जोशी, आयुष मोरे, मंगेश वादे, आदित्य चव्हाण, आदींचा समावेश आहे. महाशिवरात्र महोत्सव समितीने सामाजिक दायित्वातून राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post