पुणे प्रतिनिधी :गणेश कुंभकर्ण

 कासार समाजातील विवाहइच्छुक तरुण-तरुणींना योग्य जोडीदार निवडता यावा, यासाठी पुण्यात आयोजित करण्यात आलेला भव्य-दिव्य 'जीवनसाथी' वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला. पुणे जिल्हा विकास समिती आणि सो. क्ष. कासार श्री कालिकादेवी संस्थान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक ३१ मे २०२६ रोजी बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकातील वर्धमान सांस्कृतिक केंद्र (शत्रुंजय मंदिर) येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे अधिकृत उद्घाटन आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते दिमाखात पार पडले. या मेळाव्याला महाराष्ट्र व देशाच्या विविध भागांतून तसेच परदेशातून ८०० हून अधिक वधू-वरांनी आपली उपस्थिती दर्शवली होती.


.
 जास्तीत जास्त विवाह जमवणे हा मुख्य हेतू ठेवून या मेळाव्याची रचना अत्यंत आधुनिक पद्धतीने करण्यात आली होती. या मेळाव्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, परदेशात राहणारे कासार समाजातील उमेदवारही यात ऑनलाईन पद्धतीने थेट सहभागी झाले होते. तसेच, उमेदवार स्टेजवर परिचय देत असताना त्यांच्या बॅकग्राउंडला मोठ्या स्क्रीनवर त्यांची संपूर्ण माहिती फ्लॅश केली जात होती, ज्यामुळे पालकांना उमेदवाराची माहिती समजणे सोपे झाले. वधू-वरांना एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलता यावे यासाठी विशेष बैठक व्यवस्था (परिचय कक्ष) करण्यात आली होती. तसेच उमेदवारांमधील संवाद सुलभ करण्यासाठी तरुणांची 'टीम दोस्त' कार्यरत होती. पालक आणि मुलांमध्ये विचारांची एकसूत्रता आणण्यासाठी विशेष समुपदेशन (Counseling) करण्यात आले.



 याशिवाय ज्योतिष, कायदेतज्ज्ञ (वकील) आणि डॉक्टरांचे विशेष मार्गदर्शन वधू-वर व पालकांना या ठिकाणी लाभले. कार्यक्रमासाठी सुसज्ज हॉल, प्रशस्त पार्किंग आणि उपस्थित सर्वांसाठी सुग्रास जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांना www.punekasar.com या अधिकृत संकेतस्थळावर नावनोंदणीची सुविधा देण्यात आली होती, ज्याला भारतातून व परदेशातून मोठा प्रतिसाद मिळाला, अशी माहिती अनिल भांडेकर यांनी दिली. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्हा विकास समिती आणि सो. क्ष. कासार श्री कालिकादेवी संस्थानच्या वतीने राजेंद्र अचलारे, आनंद डांगरे, रमाकांत कानडे, अनिल भांडेकर, भास्कर अंदुरे, रंगनाथ उंडे, स्मिता धारूरकर, मंजुषा किवडे, स्वप्नील जुन्नरकर, रोहन उंडे, मंदार सासवडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजातील सर्व स्तरांतून या मेळाव्याचे अत्यंत कौतुक होत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post