कोल्हार :- (पत्रकार साईप्रसाद कुंभकर्ण)

 नवसाला पावणाऱ्या भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी दरमहा हजारो भाविक येतात. मारुतीला शेंदूरही वाहतात. मंदिर संस्थानही दररोज मारुतीला अभिषेक करून शेंदूर लेपन करते. ठरावीक कालावधीनंतर हे लेपन काढावे देखील लागते. २०१९ मध्ये भद्रामारुतीचे ३५० किलो शेंदूर लेपन काढण्यात आले. त्यातून ३० किलो शेंदूर घेऊन भद्रा मारुतीची प्रतिकृती साकारण्यात आली. संभाजीनगर शहरातील हनुमानभक्त पटेल यांनी स्वतःच्या घरातच या ५ फुटी मूर्तीची स्थापना केली. 


भाविकांची मनोकामनापूर्ती करणारा मारुती म्हणून या प्रतिकृतीला नतमस्तक होण्यासाठी हजारो भाविक येतात. या दोन्ही ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक हनुमान जयंतीला दोन्ही मूर्तीच्या अभिषेकासाठी मागील २९ वर्षांपासून खास किश्किंधा येथील पंपा सरोवराचे पाणी आणले जाते. यंदाही हनुमानभक्त पटेल यांनी किष्किंधा जावून अभिषेकासाठी जल आणले आहे. मागील ४९ वर्षांपासून हनुमान भक्तीत तल्लीन असलेल्या या भाविकाने हनुमान सेवेसाठी जीवन वाहिले आहे. ते सांगतात, वयाच्या ९ व्या वर्षी १९७६ मध्ये ते पहिल्यांदा भद्रा मारुतीला गेले तेव्हा त्यांना ही मूर्ती पाहून भक्ती जागृत झाली. तेव्हापासून प्रत्येक शनिवारी मारुतीच्या दर्शनासाठी जाण्याचे वेध त्यांना लागले. २०१९ पर्यंत त्यांनी भद्रा मारुतीच्या फेऱ्या केल्या. या दरम्यानची आठवण सांगताना ते म्हणाले, जवळच असलेल्या स्मशानभूमीतील राख उडून मारुतीवर काळसर थर येऊ लागला होता. त्यामुळे मारुतीवर छत करण्याची प्रक्रिया सुरू झाली अन् ‌त्यातून पुढे सातत्याने झालेल्या विकासामुळे आजचे मंदिर दिसत आहे.अशी माहिती हनुमानभक्त जयसुख पटेल यांनी दिली. जयसुख पटेल यांनी घरामध्ये स्थापित केलेल्या भद्रा मारुतीच्या (प्रतिकृतीच्या ) दर्शनासाठी भाविकांची हनुमान जयंतीच्या दिवशी दिवसभर मोठ्या प्रमानात गर्दी होती.याप्रसंगी हनुमान भक्त जयसुख पटेल यांच्याकडून भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post