भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान आणि त्यांनी केलेल्या चळवळींना मानवी मूल्यांची संदर्भ आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक लढ्यापाठीमागे त्यांची निश्चित अशी वैचारिक भूमिका आहे. डॉ. आंबेडकरांचा लढा हा इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला विचाराने दिलेला सम्यक प्रतिकारच म्हणावा लागेल. आंबेडकरी तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू 'माणूस' असल्याचे मतप्रतिपादन प्रमुख वक्ते प्रा. डॉ. नवनाथ अंगद शिंदे यांनी केले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लि., प्रवरानगर कार्यस्थळावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात सात्रळ महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नवनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन श्री. कैलास पाटील तांबे हे होते. यावेळी कारखान्याचे मा. व्हाईस चेअरमन श्री. रामभाऊ पाटील भुसाळ, कारखान्याचे संचालक श्री. दादासाहेब पा. घोगरे, श्री. किरण पा. दिघे, श्री. सुभाष पा. अंत्रे, श्री. अशोक पा. घोलप, श्री. संपतराव चितळकर, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. महेश कोनापुरे, प्रवरा बँकेचे संचालक श्री. भाऊसाहेब वडीतके तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना मा. खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील म्हणाले, "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू आहेत. बाबासाहेबांनी शिक्षणासाठी देशाची सीमा ओलांडल्या. बाबासाहेबांचा 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' अशा शब्दात सारे जग गौरव करते. आंबेडकर यांची साहित्याविषयी जीवनवादी, वास्तवादी आणि मानवतवादी दृष्टी दिसून येते. प्रज्ञा, शील, करुणा यांच्या आचरणातून सर्वसामान्य माणूस सुद्धा महामानव होऊ शकतो. शिक्षण हे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्रांतीचे प्रमुख शस्त्र आहे."
प्रा. डॉ. शिंदे पुढे म्हणाले, "डॉ. आंबेडकरांनी शेती समृद्ध झाल्यास देशाची आर्थिक प्रगती होईल, असे सांगितले. याच विचारप्रवाहाची दिशा घेत समकालीन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेती, शेतकरी आणि शेतमजुरांच्या समस्यावर कृतिपूर्ण कार्य करीत कारखाना उभारून शाश्वत प्रकाश टाकला. शेती आणि शेतकऱ्यांना सामाजिक न्याय मिळवून दिला. डॉ. आंबेडकर यांनी जलव्यवस्थापन आणि जलनीती या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून याच कार्याची धुरा पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी 'महाराष्ट्र पाणी परिषदे'च्या माध्यमातून नद्याजोड प्रकल्प आणि जलव्यवस्थापनाचे स्वप्न पाहिले. या जलनीतीमुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळावी, म्हणून सदर काम मूर्त स्वरूपात यावे म्हणून महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील हे कार्य करत आहेत.
आंबेडकरांना आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर सामाजिक समतेसाठी संघर्ष करावा लागला. नकार, वेदना आणि विद्रोह हा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सर्वंकष भाग ठरतो. आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या वैश्विक मानवी मूल्यांची रूजावत केली. जातिभेदाचे निर्मूलन करून सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, यासाठी ते आग्रही असल्याचे दिसतात."
याप्रसंगी डॉ. शिंदे यांनी कवी नामदेव ढसाळ, लोकशाहीर वामनदादा कर्डक, कवी यशवंत मनोहर, डॉ. धनंजय कीर यांच्या साहित्यकृतींची सोदाहरण माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार श्री. ज्ञानदेव पाटील आहेर यांनी मानले. सूत्रसंचालन श्री. सुखलाल पा. खर्डे यांनी केले.
Post a Comment