धडपडणारे युवकच मोठे क्रांतिकारी कार्य करू शकतात. व्यसनाधीनता, मोबाईलचा अतिरेकी वापर, मनोविकृत नराधम या कलयुगातील नव्या दैत्यांना ओळखा. सार्वजनिक उत्सवाचे विद्रूपीकरण करू नका. वर्तमान काळातील गैरसमज ओळखा. वेळेचे नियोजन करून दिनचर्या लिहा. विवेकबुद्धीच्या आधारे सामाजिक व्यवहार करा. युवा पिढीने आध्यात्मिक वारसा जोपासावा. जीवनाची जडणघडण करत असताना अवांतर वाचनास आध्यात्मिक उपासनेची जोड दिल्यास निश्चित यश प्राप्त होते. युवाशक्ती ही राष्ट्राची प्रेरणा आहे. राष्ट्र विकासात युवकांची कामगिरी महत्त्वाची असल्याचे मत प्रतिपादन बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाचे प्रमुख मार्गदर्शक गुरुपुत्र आदरणीय श्री. नितीनभाऊ मोरे यांनी केले.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, नाशिक युवा प्रबोधन विभाग व श्री स्वामी समर्थ युवा प्रबोधन केंद्र, लोणी (दिंडोरी प्रणित) यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी येथील आईसाहेब लॉन्स येथे राज्यस्तरीय युवा महोत्सव युवक-युवतींच्या प्रचंड उत्साहात संपन्न झाला. यावेळी डॉ. शलाका शिंदे यांनी युवतींसाठी आहार-आरोग्य समुपदेशन, केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे माजी सहाय्यक आयुक्त श्री. सुहास पाटील यांनी स्पर्धा परीक्षा, नोकरीच्या संधी व करिअर मार्गदर्शन तसेच आयकर आयुक्त श्री. मकासने साहेब यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला सामोरे जाताना याविषयीचा स्वजीवनप्रवास युवकांना सांगितला. याप्रसंगी रक्तदान शिबिर,मार्गदर्शन स्टॉल प्रदर्शन व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी उद्योजक श्री. विकास महाजन, तालुका कृषी अधिकारी श्री. विकास पाटील, श्री. नारायण पाडेकर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवी जाधव, श्री. पानसरे साहेब, प्रा. डॉ. नवनाथ शिंदे उपस्थित होते.
तरुणाईला मार्गदर्शन करताना श्री. नितीन मोरे म्हणाले," युवकांनी सुप्त क्षमता ओळखून कौशल्याधिष्ठित करिअर निवडावे. पूर्वाचार्य ऋषींनी अनेक शास्त्र निर्माण केली होती. भारतीय पारंपरिक ज्ञानरचनेतून अध्यात्मिक ऊर्जा घ्यावी. थोरामोठ्यांचे जीवनादर्श समजून घेऊन विचारांची दिशा व्यापक ठेवावी. मनाला संयमाचे लगाम असावेत. प्रबोधनात्मक विचार जीवनाची दिशा ठरवतात. आपत्ती व्यवस्थापन, स्वसंरक्षणाचे तंत्र, भारतीय ज्ञान परंपरा यांचे प्रशिक्षण श्री स्वामी समर्थ सेवा कार्यामधून मधून दिले जाते. रडणारा नाही तर लढणारा युवक तयार होणे गरजेचे आहे. आजच्या युवकांनी लढवय्या वृत्ती छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्याकडून घ्यावी. अध्ययन क्षेत्रात शूरवीराप्रमाणे संघर्ष करत यशोशिखर गाठावे."
श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करून राज्यस्तरीय युवा महोत्सवाची सुरुवात झाली. लोणी येथील युवा प्रबोधन केंद्राच्या वतीने आभार मानण्यात आले. सूत्रसंचालन श्री. जोंधळे यांनी केले. राज्यस्तरीय युवा महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ युवा प्रबोधन केंद्राच्या युवक-युवतींनी खूप खूप परिश्रम घेतले.
Post a Comment