श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे च्या जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे यांच्या मार्फत ३ मुलांची मोफत यशस्वी कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. ह्या शस्त्रक्रिया नंतर बालकांनी जन्मानंतर पहिल्यांदा आईची हाक ऐकली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,
कु.मायरा गौरव गार्डीक, वय: २ वर्ष राहणार मळद, दौंड तसेच कु. आरव आनंद डमरे वय: २ वर्ष कोथरुड, पुणे आणि कु. यशश्री अतुल सावंत वय: ३ वर्ष राहणार मोरगाव, बारामती येथील रहिवाशी असुन तिघांनाही जन्मजात श्रवणदोष होता म्हणून त्यांना ऐकुही येत नव्हते त्यामुळे त्यांना बोलताही येत नव्हते.
परंतु त्यांच्या पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घेवून बालकांची श्रवण तपासणी करुन घेतली तरी त्या तपासणी रीपोर्टनुसार डॉक्टरांनी कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रिया करुन घेण्याचा सल्ला दिला या शस्त्रक्रिया करीता प्रत्येकी किमान ८ ते १० लाख इतका खर्च येणे अपेक्षित होता परंतु या तिन्ही बालकांची घरची अर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्या कारणाने ते ही शस्त्रक्रिया करु शकत नव्हते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट्च्या जय गणेश रुग्णसेवा अभियान द्वारे ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रिया मोफत करुन देण्यात असल्याचे मेसेज आणि पत्रक सोशल मीडियावर त्यांनी पाहिले असता पालकांनी दगडूशेठ ट्रस्टच्या वैद्यकिय विभागात जावून भेट घेतली व ट्रस्टच्या वैद्यकीय विभागाने सदर रुग्णाच्या नातेवाईकांना मोफत शस्त्रक्रियेचे ज्युपिटर हॉस्पिटलच्या नावे पत्र दिले.
त्यानुसार बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलने दगडूशेठ ट्रस्टचे पत्र स्वीकारुन त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आणि फेब्रुवारी महिन्यात या ३ बालकांची पूर्णपणे मोफत आणि यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया पूर्ण झाली. ही मोफत शस्त्रक्रिया करून देण्यासंदर्भात हॉस्पिटल सीईओ डॉ.राजेंद्र पाटणकर व त्यांचे इतर सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
डीस्चार्ज नंतर या ३ बालकांनी आपल्या परीवारसह दगडूशेठ गणपती बाप्पाची आरती करुन आशिर्वाद घेतला व ट्रस्टचे आभार मानले यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, ट्रस्टचे वैद्यकीय व्यवस्थापक राजेंद्र परदेशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे मंगेश सूर्यवंशी, सिद्धार्थ गोडसे सर्व विश्वस्त आणि मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment