परभणी,दि.10(प्रतिनिधी) : 
 येथील पशुवैद्यकीय व पशूविद्यान महाविद्यालयात कृत्रिम रेतनासाठी सिम्युलेटर गायीच्या मॉडेलची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील प्रजनन, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात मैत्री प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आले आहेत. या प्रशिक्षण उपक्रमांचा एक भाग म्हणून, डॉ. अभिनय सावळे, सहयोगी प्राध्यापक आणि मैत्री प्रशिक्षण प्रकल्प समन्वयक यांनी, एमएएफएसयू नागपूरचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भीकाने आणि येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधीर राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम रेतनासाठी सिम्युलेटर गायीचे मॉडेल प्राप्त केले आहे. 3 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कार्यकारी परिषद सदस्य आर. एस. खांदे यांनी पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाला निम्न शिक्षण समन्वयक डॉ. पंडीत नांदेडकर यांच्या समवेत भेट दिली. या भेटीदरम्यान, त्यांनी प्रजनन, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागातील सिम्युलेटर गायीच्या मॉडेलची पाहणी केली. यावेळी, प्रकल्प समन्वयक डॉ. अभिनय सावळे यांनी या नवोत्तर सुविधेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, हा सिम्युलेटर प्रशिक्षणार्थी पशुवैद्य आणि दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांसाठी एक प्रभावी प्रशिक्षण साधन ठरणार आहे. या मॉडेलच्या साहाय्याने प्रशिक्षणार्थींना कृत्रिम रेतन तंत्रज्ञान शिकता येणार असून प्रत्यक्ष जनावरांना त्रास न देता प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हा आधुनिक सिम्युलेटर गायीच्या प्रजनन प्रणालीतील माज/उष्णता निर्माण होण्याच्या नैसर्गिक परिस्थितीचे अनुकरण करतो आणि प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष अनुभव मिळतो, असे ते म्हणाले. कार्यकारी परिषद सदस्य आर. एस. खांदे यांनी डॉ. अभिनय सावळे व डॉ. सुधीर राजूरकर यांच्या या आधुनिक प्रशिक्षण सुविधेच्या स्थापनेसाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच त्यांनी या सुविधेमुळे पशुवैद्यकीय विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी आणि संशोधकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृत्रिम रेतन प्रशिक्षण अधिक अचूकतेने आणि आत्मविश्‍वासाने घेण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.या उपक्रमामुळे पशुवैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण पद्धतींमध्ये मोठी सुधारणा होणार असून, भावी पशुवैद्य आणि दुग्धशेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्तम प्रशिक्षण मिळण्यास मदत होणार आहे. 



 सिम्युलेटर गायीच्या मॉडेलची वैशिष्ट्ये.... योनी, गर्भाशयमार्ग, गर्भाशय, अंडाशय आणि गुदमार्ग तपासणीसाठी मॉडेलची सुविधा, प्रशिक्षणादरम्यान बाजूच्या खिडकीतून आणि वरच्या बाजूने निरीक्षण करण्याची सोय, प्रशिक्षणार्थी आणि दुग्धशेतकर्‍यांसाठी योग्य उंची व प्रत्यक्ष गायीच्या आकारमानाचे मॉडेल. नैसर्गिक प्रजनन परिस्थितीचे अनुकरण करण्यासाठी माज निर्माण करणारे सेन्सर्स, टिकाऊ एफआरपी साहित्यामध्ये तयार केलेले आणि सुलभतेने चालवता येणारे हे मॉडेल आहे.

Post a Comment

Previous Post Next Post