ठाणे प्रतिनिधी :- पाहुण्यांचे जसे आपण आदरातिथ्य करतो, त्याप्रमाणे गुणवतांचे कौतुक करून तेजस्वी फोऊंडेशनने महत्वाचे राष्ट्रकार्य केले आहे. राष्ट्राच्या प्रगतीत गुणवंतांचे योगदान अतिशय महत्वाचे असते. असे प्रज्ञावंत राष्ट्र घडवीत असतात.समाजाला दिशा देत असतात.तेजस्वी सन्मान सोहळा २०२४ हा अत्यंत देखणा, आटोपशीर आणि शिस्तबद्ध रीतीने आयोजित केलेला कार्यक्रम म्हणजे देवापुढे ठेवलेल्या पंचामृतासारखा आहे, इतर कार्यक्रमाप्रमाणे त्याची मिसळ झालेली नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते आणि गप्पागोष्टीकार जयंत ओक यांनी केले. ठाणे, मराठी ग्रंथ संग्रहालय येथे तेजस्वी फाऊंडेशन तर्फे शनिवारीआयोजित केलेल्या तेजस्वी सन्मान सोहळा 2024 या भव्य कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. अशोक पाटील, प्रा.प्रज्ञा पंडित, दिग्दर्शक मनिष पंडित उपस्थित होते. यावेळी बोलताना ",जयंत ओक आपल्या भाषणात पुढे म्हणाले की "प्रज्ञावंतांचा सन्मान आपल्याकडेही प्रज्ञा लागते. समाजात प्रत्येक स्तरावर आपापल्या क्षेत्रात झोकून देऊन काम करणारे अनेक गुणवंत असतात. त्यांना ओळखून, त्यांच्या कार्याचा प्रसार करून, त्यांचा यथायोग्य सन्मान करणे गरजेचे असते, जेणेकरून त्यांना आयुष्याच्या पुढील वाटेवर काम करताना अजून हुरूप येईल, उत्साह येईल. तेजस्वी फाउंडेशन ही वृध्दाश्रम, अनाथाश्रम, अन्नछत्र, आदिवासी शाळा, ग्रामीण भागातील मराठी शाळा अशा समाजाच्या विविध सामाजिक स्तरावर मागची दहा वर्षे सातत्याने मदत करणारी प्रा. प्रज्ञा पंडित आणि मनिष पंडित यांची संस्था आज समाजातील गुणवंतांचा सत्कार करत आहे ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. एरवी सोहळ्यांमध्ये दिसणाऱ्या भपकेबाजपणाची मिसळ न करता समाजासाठी झटणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींसाठी केलेले हे पंचामृत आहे. तेजस्वी फाउंडेशन सन्मान सोहळ्यात डॉ. श्रीराम पंडित, दत्ता खंदारे, डॉ. संजय नागावकर, चंद्रकांत घाटगे, शशिकांत सावंत, अशोक कांबळे, निलेश राऊत,हिरालाल साळी (लोखंडे) यांना तेजस्वी समाज भूषण, राजीव प्रधान, अर्चिस जोशी, काळूदास कनोजे, नारायण गाडेकर, सुरज अनभवणे, डॉ. जितेंद्र गिरासे, अनुजा संखे, अमोल निरगुडे, प्रा. साईप्रसाद कुंभकर्ण,प्रा. रुपेश महाडिक यांना तेजस्वी साहित्यिक तर रवींद्र माने यांना तेजस्वी पत्रकार या पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. अशोक पाटील यांनी पुरस्कारार्थीना शुभेच्छा दिल्या. या देखण्या कार्यक्रमाचे प्राजक्ता जोशी यांनी सुंदर निवेदन केले. 'स्वरचित आर्ट्स' या उद्योग संस्थेच्या स्वप्ना नाईक यांनी आपल्या संस्थेतील कलात्मक वस्तू सवलतीच्या दरात पुरस्कारार्थीना उपलब्ध करून दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post