दुर्गापूर ता राहता हे साईबाबा समकालीन सद्गुरू आनंदा बाबा यांचे संजीवन समाधी तीर्थक्षेत्र. तसेच काका मामा मावशी आत्या इत्यादी हक्काच्या रक्ताच्या व रक्तापलीकडील जाती धर्माच्या भिंती पाडत तशाच संबोधनाने नात्याची घट्ट वीण जपत असलेलं महाराष्ट्रातील एकमेव संस्कार व संस्कृती श्रीमंत गाव. त्यामुळे गावात सुख दुःखाचे अश्रू जरूर ओघळले पण रक्त कधीच सांडले नाही ही गावाची वेगळी शानदार ओळख ठरली आहे. असा शेकडो वर्षाचा वारसा असणाऱ्या गावात काशिनाथ लक्ष्मण मनकर हे व्यापारी वृत्तीचे बहुधा पहिले गृहस्थ असावेत. त्यांचे मारुती मंदिराच्या बांधनीच्या वरच्या बाजूला बसक्या मातीच्या घरात छोटेखानी वाण सामान दुकान होते. थोडी शेती आणि दुकान उपजीविकेचे साधन त्यामुळे परिस्थती गरिबीची त्यांना तीन मुले ठकाजी कारभारी चांगदेव व एक मुलगी त्यामुळे खाणारी तोंडे जादा व कमाई कमी त्यामळे शाळा ही त्याकाळी त्यांना न परवडणारी चैन ठरली होती. त्यामळे एकत्रित कुटुंबात मिळेल ते काम करत ही भावंडे वाढू लागली. यातील कारभारी काशिनाथ मनकर एक. त्यांचे नुकतेच वयाच्या 85 व्या वर्षी दि 1 फेब्रुवारी 2022 रोजी वर्धापकाळाने सकाळी 7.50 वा निधन झाले. त्यांच्या विषयी चार शब्द. आईची मावशी चंद्रभागाबाई सयाजी मनकर हिचे ते पुतणे त्यामुळे आम्ही त्यांना कारभारी मामा म्हणत असू. धोतर टोपी आणि तीन गुंड्याचा सदरा पण ते रानात टोपी धोतर कोपरी अशा वेशात काम करताना मेंढ्या राखताना दिसायचे. माती आणि माणसे हा त्यांच्या आवडीचा विषय. त्यामूळे बांधा कोंदाने वहिवाट असलेल्या साठच्या दशकात रानात काम करताना जाणाऱ्या येणाऱ्या लहान थोरांशी मामा बोलायचे. याचा मी आजोबांच्या पाठकुळी बसून शाळेत पहिली दुसरीला 72 73 साली जाताना अनेक वेळा अनुभव घेतला. ते आजोबांना मामा व आजीला आत्या म्हणत कारण त्यांची चुलती आजीची चुलत बहीण होती. त्यांचे बोलणे वागणे हे मला घडविणारे जिवंत माणसांचे विद्यापीठ होते. निरक्षर पण शहाणी माणसे या निमित्ताने मला भेटली. माझी आपत्ती मला संपत्ती यामुळे ठरली. काशिनाथ बाबाच्या दुकानापुढून मला शाळेत घेऊन जाताना आजोबा त्यांना राम राम करत तेही म्हणत सोयरे थोडं टेका कोसभर चालून आलेत. मग ते बसायचे त्यांचे ते बोलणे तेंव्हा कळायचे नाही पण आज कळते. ते नेहमी माणसाच्या चांगल्या गोष्टी विषयी सकारात्मक श्रद्धा व सबुरीचे बोलायचे मला पेपर मिटच्या पांढऱ्या गोळ्या द्यायचे पण यामध्ये मला त्यांची गावबोली कळायला लागली. हेच संस्कार घेऊन कारभारी मामा यांचा वत्सलाबाई शंकर मुसम्माडे या कष्टाळू प्रेमळ मुलीशी विवाह झाला.वत्सलाबाई सौ हॊशाबाई कारभारी मनकर म्हणून सासरी आल्या. दोनाचे चार हात झाले पण गरीबी पाठ सोडायला तयार नाही मेंढ्याचे खांड वळणे खोती घेतलेले आंबे उतरविणे आणि शेतीची कामे करत प्रपंच करताना त्यांनी त्यांचा राम अवतार कधी सोडला नाही. आपलं ते आपलं दुसऱ्याच्या काडीला हात लावायचा नाही अशी रामवृत्ती ते आयुष्यभर जगले. त्यामूळे त्यांच्या आयुष्यात कधीच महाभारत घडले नाही. त्यात त्यांना त्यांच्या धर्मपत्नी सौ हौशाबाई यांनी मोलाची साथ दिली. त्यांना सुशीला मंदा दत्तात्रय व उषा अशी चार अपत्ये. एकत्रित कुटुंबा मधून वेगळे होताना दिडबिघा जमीन आणि हा सहा जीवांचा कुटुंब कबिला. राबते हात पूर्वीप्रणाने कमी आणि खांणारी तोंडे जास्त पण येथेही या कुंटुबाने हार पत्करली नाही. मोठ्या मुलींनी आई बरोबर कामात हातभार लावला मिळेल ते काम करून बहिणींनी भावाला शिकवून पदवीधर केले. त्यानेही शिक्षण घेत बापाच्या हातचे कष्ट हाती घेतले. याच दरम्यान सुशीला व मंदा यांची लग्ने होऊन कोल्हारला खर्डे व तांदूळनेरला नाईकवाडे परिवारात सुखाने नांदू लागल्या. दिवस साथ देऊ लागले पेरलेल्या प्रामाणिक कष्टाच्या सुगीची रास शिग धरू लागली पण सहज साधेपणाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही या वृत्तीने जगणाऱ्या मुली मुले ही कारभारी मामांची खरी श्रीमंती. त्यातील सौ उषा ही माझी धर्मपत्नी ती गोष्टही आजच्या काळात खूप संस्कार दर्शी सकारात्मक अशी ठरत आहे. सासर माहेर एक असताना देखील आमची भेट झाली ती थेट एकमेकांच्या गळ्यात हार घालताना बोहल्यावर. आईची मावस बहीण सौ जनाबाई पुलाटे हिच्या मनात आलेला आमच्या लग्नाचा विचार कारभारी मामांना सांगितला. पुढची कार्यवाही सुरू झाली मला काहीच कल्पना नसताना एक दिवस अचानक माझे मार्गदर्शक श्री एम एम पुलाटे साहेब संध्याकाळी कारभारी मामांना रानातून आहे तसे फाटक्या कोपरीवर गाडीत घेऊन आले. मोठ्यांच्या भानगडीत पोरे नसण्याचा तो काळ. चहापाणी चर्चा होऊन ते गेले थेट तीन दिवसांनी ती गोष्ट माझ्या पर्यंत आली. मन गोंधळलेले माझे सख्खे मित्र संजय बच्छाव व ज्यांनी मला लोकांनी पाय ओढण्याचा काळात त्यांचे पाय हक्काने दिले असे भागवत अनाप ज्ञानदेव पुलाटे उर्फ माऊली यांनी मनाची आघाडी सांभाळीत सर्व गोष्टी समजून घेतल्या. शिक्षण आणि शहाणपण यांचा काहीही संबंध नसतो हे कारभारी मामांसारख्या जुन्या जाणत्यांची उदाहरणे देऊन ठासून सांगितले. आणि माझा होकार मिळविला साहित्य क्षेत्रातील माझ्या धडपडीचे अनेकांना कौतुक असण्याचा तो काळ. त्यामुळे महाराष्ट्रातील दिगग्ज साहित्यिक लग्नाला आलेले एक छोटे साहित्य संमेलन म्हणजे आमचे लग्न. त्यावेळी आशीर्वाद देताना मा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक वाक्य वापरले होते कारभारी काशिनाथ मनकर पाटील यांनी मनाचा मोठेपणा दाखविला आणि हा योग जुळवून आणला त्यांना मी मनःपूर्वक धन्यवाद देतो. मला हे वाक्य त्यावेळी वेगळे वाटले परंतु आज मागे वळून पाहताना त्याचा प्रत्यय येतो. असल्यानंतर विश्वास ठेवणारे अनेक असतात पण काहीही नसताना केवळ मतीवर विश्वास ठेवणारा हा मातीत मळलेला माणूस किती आभाळगामी होता याची प्रचिती आली. माझा माझ्या लग्ना विषयी एक समज होता बाहेरून लांबून आलेली सर्व माणसे माझ्यासाठी आली परंतु जेंव्हा मी माझे साहित्यिक मित्र कमलाकर देसले सर यांचा आमच्या लग्नाविषयीचा कोर्ट उठेपर्यंत शिक्षा हा ऍग्रोवन मधील लेख वाचला तेंव्हा कळले बहुतेक जन सौ उषाला व कारभारी मामांच्या परिवाराला भेटण्यासाठी आले होते त्यामध्ये अनाथांची माता सिंधुताई सपकाळ आणि आमची माई होती लग्नात सौ उषाच्या कानात सांगितले पोरी तू पदरात विस्तव बांधून घेतला आहेस विस्तव विझू देऊ नको अन पदरही पेटू देऊ नको तिने हे शब्द शब्दशः खरे केले ते कारभारी मामांच्या कृतीयुक्त संस्कार शिकवणुकीने कारण आमचे लग्न केवळ लग्न नव्हते तर मती मातीच्या विचार मिलनाचा पुरोगामी सोहळा होता . ज्या माणसाने शाळेची पायरी चढली नाही त्याच्या भेटीला विद्वानांची फळी यावी ही त्यांच्या काही न बोलता कृतीतून संस्कार संस्कृती जपण्याची खऱ्या श्रीमंतीची ओळख ठरली. त्यास पुष्टी म्हणून अस्तिव परिवार श्रीरामपूर यांनी महिला दिनाच्या खास भव्य समारंभात सन्मानपूर्वक सहा सात वर्षांपूर्वी सौ उषाचा आदर्श अर्धांगिनी पुरस्कार देऊन केलेला गौरव होय. त्यांच्या दोन्ही कन्या सुशीला व मंदा यांनी त्यांचा शेतीचा वारसा व वसा सांभाळत आनंदाने जीवनात सफलतेने वाटचाल करत यश मिळविले आहे. मुलगा दत्तात्रय पर्सनल ऑफिसर म्हणून विखे पाटील कारखान्यात कार्यरत आहे. नातवंडे चांगले शेतकरी उच्च शिक्षित इंजिनिअर मॅनेजर अशा उच्च पदावर कार्यरत आहेत. आज कारभारी मामांना अपेक्षित स्वप्नपूर्ती रूप म्हणजे रजाचे गज झालेले वारसदार आणि झोपडीची झालेली माडी ती समोर दिसते आहे. पण याला कारण फाटक्या कापडात देखील यांनी काळीजाचे नेटके पण जपण्याचा आपला धर्म कधीच सोडला नाही तसेच दिलेल्या शब्दाला आणि ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही हे आहे. माझी अंधारातील सावली सौ उषा हिच्या खुशाली विषयी एकदा त्यांना आजीने विचारले तेंव्हा ते जे बोलले ते आजच्या सुशिक्षित मुलींच्या सुशिक्षित आईवडिलांना मार्गदर्शक असे आहे. ते म्हणाले होते आत्या फांदीचे फुल तोडून महादेवाच्या पिंडीवर ठवले की बापाचे काम झाले पुढचे महादेवा हाती.शारीरिक मर्यादांच्या महामार्गावर खुरडत चालणाऱ्या एका सामान्य बुद्धिवादी मुलावर विश्वास ठेवून त्यास सत्पात्री कन्यादान करणारे आजच्या काळातील ते श्रीमंत मनाचे राजा जनक ठरतात. हजार पुस्तके वाचून न मिळणारे शहाणपण एका वाक्यात पुस्तके वाचून झालेल्यांच्या मस्तकात पेरण्याचे बापधर्म जपण्याचा केलेला उच्च कोटीचा कृतीयुक्त कार्य म्हणजे आमचा विवाह. मुलींच्या संसारात विनाकारण लुडबुड करून सासू सासऱ्यांना वृद्धा श्रमाची पायरी चढायला लावणाऱ्या समाजाला स्वधर्माची जाणीव करून देणारी शिकवण देणारी ही घटना आहे.म्हणून कारभारी मामा पितृधर्मी श्रीमंत आदर्श ठरतात. आपले वारकरी परंपरेचे माळकरी व्रत अखेरच्या श्वासा पर्यंत पक्ष घाताने एक तप शरीर लुळे पडले चार वर्षांपासून वाचेने साथ सोडलेली तरी माझ्या जन्मझुला या काव्यासंग्रहास आशीर्वादपर प्रस्तावना लिहिणारे माझे जीवन काव्य मार्गदर्शक कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची तक्रार नाही खंत नाही पूर्तीसाठीच प्रवास असतो केंव्हातरी मिटण्यायासाठीच काळजा मधील श्वास असतो ही कविता त्यांना भेटल्यावर कशी जगता येते याचा प्रत्यय कृतार्थपणे व सहज आनंदाने संत वृत्तीने जगताना व हसताना पाहून येत असे. त्यांच्या वारकरी वृत्तीचा आदर्श सेवा वारसा नातू चि विकास आय टी इंजिनिअर याने आजोबांना मित्र म्हणून जो आनंद दिला सर्व प्रकारची अगदी लहान मुलासारखे खान पान शी सू स्वच्छता पाहून त्यांच्या जगण्याचा सेवा भाव त्यांना याची देही याची डोळा अनुभवायला दिला ही आजच्या तरुणाईला आदर्श ठरणारी अभिनंदनीय अशी गोष्ट आहे . तसेच ही वृत्ती सून पत्नी मुलाने कर्तव्य भावनेने जपला आहे.कारभारी मामांचा निरपेक्ष सेवा भाव जपण्याचा प्रयत्न करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 1 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 7 50 वा त्यांनी यहलोकीची यात्रा संपवून ते अनंताच्या प्रवासाला गेले. त्यांचा गुरुवार दि 10 फेब्रुवारी 2022 रोजी होणारा दशक्रिया विधी त्यांचे चुलत बंधू रघुनाथ जयवंत मनकर उर्फ हसतमुख हाकेला ओ देण्यास सदा सेवा तत्पर असे रघुमामा यांच्या दि 5 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या दुःखद निधनामुळे दोन्ही दशक्रिया विधी मंगळवार दि 15 फेब्रुवारी 2022 रोजी दाढ बु येथे सकाळी 8 वा होत आहे.त्या निमित्ताने या उभयतांना सर्व नातेवाईक आनंद संप्रदाय आनंदयात्री वारकरी मंडळी मनकर खर्डे नाईकवाडे पुलाटे परिवार दुर्गापूरकर परिवार शब्दस्नेही अक्षर परिवार व प्रवरा परिवाराचे वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली परमेश्वराने त्यांना सदगती द्यावी ही मनोभावे प्रार्थना. जय हरी माऊली 

लेख- यशवंत पुलाटे (प्रस्तुत लेखक जावई व प्रथितयश ग्रामीण साहित्यिक आहेत .)


Post a Comment

Previous Post Next Post