कोल्हार (वार्ताहर) : साईप्रसाद कुंभकर्ण / गणेश कुंभकर्ण कोल्हार भगवतीपूर येथील ग्रामदैवत श्री भगवतीमातेचा नवरात्र महोत्सव यंदा कोरोना च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून केवळ मंदिरात विधीवत घटस्थापना, अभिषेक व आरती अशा स्वरूपात साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष भाऊसाहेब तथा सयाजी रघुनाथ खर्डे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. भास्करराव खर्डे पाटील, माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे पाटील यांनी दिली. श्री भगवतीमातेच्या नवरात्र महोत्सवास दि. ७ आॅक्टोबर रोजी घटस्थापनेपासून प्रारंभ होत आहे. नवरात्र महोत्सवाच्या नियोजनासाठी भगवती देवी मंदिरात आयोजित देवालय ट्रस्टचे विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. राज्य शासनाने दि. ७ आॅक्टोबर म्हणजेच घटस्थापनेपासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याबरोबरच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मंदिर व्यवस्थापनांसाठी नियमावलीही जाहीर केली आहे. दरम्यान राहाता तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने तहसीलदारांनी कोरोना ची साखळी तोडण्यासाठी आठवडेबाजारासह गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध घातले आहेत. राज्य शासनाच्या कोरोना प्रसार रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या नियमावलीची नवरात्र महोत्सव काळात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. मंदिर परिसरात प्रसाद, पूजा साहित्य, खाद्यपदार्थ आणि खेळणीची दुकाने लावण्यास प्रतिबंध असणार आहे. भाविकांना विनामास्क मंदिरात प्रवेश करण्यास मनाई आहे. तसेच भाविकांना मंदिर गाभारा आणि सभामंडपात जाण्यास मज्जाव आहे. भाविकांना दर्शन रांगेत सोशल डिस्टन्स ठेवूनच दर्शन घेणे बंधनकारक असणार आहे. नवरात्र काळात नऊ दिवस मंदिरात वास्तव्यास राहून उपवास करणाऱ्या अर्थात घटी बसणाऱ्या महिला भाविकांना यंदा मात्र मंदिरात वास्तव्य करता येणार नाही. तसेच नवरात्रात नऊ दिवस(माळ) देवीस साडी चोळी नेसविण्याचा तळीचा कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. यावेळी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष सयाजी रघुनाथ खर्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. भास्करराव खर्डे, माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे, ट्रस्टचे खजिनदार नंदकुमार खांदे, सरचिटणीस बापूसाहेब देवकर, विश्वस्त प्रकाशराव खर्डे, दिनकर कडसकर, भाऊसाहेब प्रभाकर खर्डे, प्रभाकर दामोधर खर्डे, श्रीकांत खर्डे, सुरेश निबे, कामगार तलाठी श्रीमती सुरेखा आबुज, ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post