कोल्हार भगवतीपूर (प्रतिनिधी): गणेश कुंभकर्ण
कोल्हार -भगवतीपूर येथील श्री.हनुमान भक्तांच्या वतीने हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला 'भव्य मिरवणूक सोहळा' रविवार दि: 05 एप्रिल रोजी अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. सायंकाळी संत कैकाडी महाराज चौक येथून निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले.
मिरवणुकीत कोळपेवाडी येथील माऊली डिजिटल बँड'च्या तालावर तरुण वर्ग थिरकला.
विशेषतः बजरंगबली आणि वानरसेनेचा हुबेहूब 'जिवंत देखावा' या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरला. हा देखावा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी झालेली फटाक्यांची आतिषबाजी आणि पेपर ब्लास्टमुळे मिरवणुकीत मोठी रंगत आली होती.
अंबिका नगरमधील संत कैकाडी महाराज चौक येथून निघालेली ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली. 'जय श्रीराम' आणि 'पवनपुत्र हनुमान की जय' च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
या सोहळ्यासाठी कोल्हार भगवतीपूर परिसरातील शेकडो भाविक आणि श्री राम व हनुमान भक्त उपस्थित होते. सकल हिंदू समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार न घडता ही मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.
Post a Comment