राहाता : शिर्डी येथे आयटी पार्क उभारण्यासाठी श्री. साईबाबा संस्थानला शेती महामंडळाची जमीन मंजुर झाल्याचा ठराव माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाणीवपूर्वक रद्द करुन, आयटी पार्कच्या उभारणीत खोडा घातला असल्याचा थेट आरोप ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. आयटी पार्कवर भाष्य करणा-या शरद पवारांनी याची जरा माहीती घेवून आपल्या शेजारी बसणाऱ्या संगमनेरच्या नेत्याला ते जाब विचारणार का? असा प्रश्ही त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला. निवडणूक प्रचारार्थ अस्तगाव येथील झालेल्या जाहीर सभेत मंत्री विखे पाटील म्हणाले की, राहात्यात येवून जाणत्या राजांनी बरीच मुक्ताफळ उधळली. यामध्ये त्यांनी शिर्डी येथील आयटी पार्कचा उल्लेख करुन हे काम कोणी होवू दिले नाही अशा केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना त्यांनी याबाबतची सविस्तर माहीतीचे कागदपत्रच सभेमध्ये दाखविले. शेती महामंडळाची जमीन संस्थानला देण्याचा ठराव तत्कालिन महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ७ जुलै २०१७ रोजी झाला होता. त्यामध्ये १३१ एकर जमीन देण्याचा निर्णय केला होता. मात्र आघाडी सरकार मधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी २३ फेब्रुवारी २०२१ रोजी घेतलेल्या बैठकीत या १३१ एकर जागेचा मंजुर झालेला ठराव रद्द केला. त्यामुळे शिर्डी येथील आयटीपार्कच्या उभारणीत कोणी खोडा घातला याची माहीती आता पवार साहेबांनी घ्याची असे थेट आव्हान ना. विखे पाटील यांनी दिले.
गोदावरी कालव्यांचे पाणी कमी झाल्याचा उल्लेख पवार यांनी आपल्या भाषणात केला होता. यावरही सडकून टिका करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,२००५ साली समन्यायी पाणी वाटप कायदा ज्यांनी केला त्यांना तुम्ही बरोबर घेवून बसता मग हा कायदा थांबविण्याचे धाडस तुम्ही का दाखविले नाही. कारण तुम्हाला जिल्ह्यामध्ये केवळ पाणी प्रश्नावरुन झुंडी जावून द्यायच्या आहेत. वरच्या धरणाचे पाणी एक्सप्रेस कालव्याने तुम्ही थेट गंगापूरकडे वळविले, याकडे दुर्लक्ष कसे करता.निळवंडे धरणाच्या बाबतीतही मुख्यमंत्री असून सुध्दा निळवंडे धरणाच्या बाबतीतही पवारांची हीच भूमिका राहीली. जिल्ह्यात येवून चार चार वेळा भूमीपुजनं केली. पण धरणाच्या कामाला निधीची तरतुद तुम्ही करु शकला नाहीत. इकडचा निधी कमी करुन, पुणे जिल्ह्यातील धरणांना तुम्ही किती निधी दिला असा प्रश्न उपस्थित करुन, केवळ खासदार साहेबांना बदनाम करण्याचे हे कटकारस्थान होते. यामध्ये जिल्ह्यातील काही पुढारी बळी पडल्याचे त्यांनी सांगितले. पक्षांतर केल्याची टिका आमच्यावर करता पण पक्ष फोडण्याचे सर्वात मोठे पाप हे आतापर्यंत तुम्ही केले आहे. राजकारणातील सर्वात विश्वासघात तुम्ही केल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्ह्यातील कुकडीच्या कामाचा उल्लेख करुन, मंत्री विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्याच्या हक्काचे पाणी त्यांनी मिळू दिले नाही. पवारांच्या काळात कुकडी कालव्याचे अवघे १० कि.मी काम झाले. पण राज्यात युती सरकार आल्यानंतर मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली ७० कि. मीचे काम होवू शकले. या जिल्ह्याचा वापर पवारांनी फक्त भांडणे लावण्यासाठी केला. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनीच अडथळे आणले.

Post a Comment

Previous Post Next Post