अहमदनगर प्रतिनिधी : जिल्हयात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची आता कडाक अमलबजावणी केली जाणार आहे. नागरिकांनीही त्याचे पालन करावे. त्यामुळे लॉकडाऊन करावा लागणार नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र  भोसले यांनी केले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज अहमदनगर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स नंतर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कोरोना प्रतिबंध संदर्भात विविध विभागांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, महापालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप नीचीत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे्, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब भोसले, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला.


जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, जिल्हयात कोरोना रुग्णाच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गर्दी होत असलेल्या ठिकाणी तसेच प्रतिबंध केलेल्या ठिकाणी आता जिल्हा प्रशासनाचे विशेष लक्ष असणार आहे. जाणीवपूर्वक नियमांची पायमल्ली करत असलेल्या नागरिकांवर आता कडक कार्यवाही केली जाणार आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन टाळायचा असेल तर नागरिकांनीही आता नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. 


जिल्ह्याच्या काही भागात रुग्ण संख्या वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. अशा ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्याठिकाणी केंद्र आणि राज्य शासन आणि आरोग्य विभागाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. याशिवाय, यापुढे  बाधित रुग्णांना आता घरीच अलगिकरण करण्याऐवजी त्यांना कोविड केअर सेंटर मध्ये ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात सर्व यंत्रणांना कोविड केअर सेंटर आवश्यक त्या सुविधांनी परिपूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती डॉ. भोसले यांनी दिली.


जिल्ह्यात रात्री १० वाजल्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना सार्वजनिक ठिकाणी बाहेर फिरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. आता त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून तशा सूचना पोलिस, मनपा, परिवहन विभाग, सर्व तहसिलदार यांना देण्यात आल्या आहेत. बाहेर गावाहून आलेले किंवा लग्न समारंभ किंवा इतर सोहळ्यात सहभागी होऊन नंतर कोरोना बाधित झालेल्यांचे प्रमाण जास्त दिसत आहे. याशिवाय आठवडी बाजारात गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून लग्न समारंभासाठी पूर्व परवानगी आवश्यक करण्यात असल्याची माहिती त्यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post