महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच उद्योजकतेचे धडे मिळावेत, त्यांच्यामध्ये उद्योजकतेची बीजे रोवली जावीत तसेच उद्योगधंद्यांमध्ये येणा-या अडीअडचणींची जाणिव व्हावी आणि त्यातूनच नोकरी देणारे उद्योजक तयार व्हावेत या उद्देशाने लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरानगर या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.सुस्मिता विखे पाटील, या मागील 2 वर्षांपासून संस्थेच्या विविध कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, तंत्रनिेकेतन, औषधनिर्माणशास्त्र, कृषि व संलग्नीत महाविद्यालये अशा विविध शाखांमधील विद्यार्थ्यांकरिता Business Expo. चे आयोजन करीत आहेत. 2024 मध्ये ‘सहकारातून समृद्धीकडे - शिक्षणातून विकासाकडे’ या संकल्पनेवर आधारित आयोजित करण्यात आलेल्या या एक्सपोमध्ये 850 विद्यार्थ्यांनी 150 पेक्षाही जास्त स्टॉल्स उभारुन उद्योग क्षेत्राकडे ओढा असल्याचे दाखवून दिले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या उद्यमशिलतेतून सुमारे 1 कोटीं रुपयांची उलाढाल झाली, तसेच यावर्षीच्या म्हणजे दुस-या वर्षीच्या एक्सपोचे आयोजन ऑक्टोबर 2025 मध्ये पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचारावर आधारित Think Globally Act Locally म्हणजे “वैश्विक पातळीचा विचार करुन - त्याची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी” तसेच देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी नेहमीच आपल्याला Vocal for Local म्हणजे स्थानिक उत्पादने तयार करुन त्याची स्थानिक पातळीवरच विक्री करण्याचा संदेश देत आहेत, त्यामुळे स्थानिक रोजगारांना चालना मिळून भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होण्यास निश्चितच मदत होणार असून, भारत देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणार आहे. या Expo मध्ये विविध तांत्रिक, अतांत्रिक व कृषि संबंधित सर्व शाखांचे जवळपास 170 स्टॉल्समधून 950 विद्यार्थी-विद्यार्थींनी (Business Stall, Food Stall व Funny Games) स्टॉल्स उभारले होते. या विचारांवर चालण्यासाठी डॉ.सुस्मिता विखे पाटील यांनी उचललेले हे एक पाऊल आहे. यावर्षी विद्यार्थ्यांनी जवळपास दिड कोटीच्या वर उलाढाल केली आहे. विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनाही व परिसरातील नागरिकांना नेहमीच अशा नाविण्यपूर्ण उपक्रमांतून व्यावसायिकतेचे धडे तर मिळतातच, शिवाय मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होतांना यातून दिसून येते. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था ही नेहमीच नाविण्याचा ध्यास घेऊन, विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच त्यांचा सर्वांगिण विकास घडवून आणण्यामध्ये अग्रेसर असते. याचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. याच संकल्पनेवर आधारीत यावर्षीच्या Business Expo.चे आयोजन करण्यात आले. केंद्र शासनाने नुकत्याच लागू केलेल्या नवीन “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP-2020” चा च हा एक भाग म्हणता येईल.
उद्योजक ही अशी व्यक्ती असते ती देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावु शकते, बाजारपेठेची आवश्यकता - गरज ओळखून व्यवसाय सुरु केल्यास निश्चितच त्यामध्ये यश संपादन केले जाऊ शकते. कोणताही नवीन व्यवसाय सुरु करतांना त्यामध्ये कोणकोणत्या अडचणी येऊ शकातात, त्यामध्ये जोखीम कशा प्रकारची असते, यात नाविण्य आणि संधी ओळखणे याबाबत विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अनुभव घेतला तसेच विद्यार्थ्यांनी आपापसांमध्ये संवाद साधून एकमेकांच्या अनुभवांचीही देवाण-घेवाण केली. कोणताही छोटा उद्योग-व्यवसाय सुरु करावयाचा असल्यास त्यासाठी मानसिक तयारी आवश्यक असते, थोड्याफार प्रमाणात अनुभव पाठीशी असल्यास त्यामध्ये निश्चितच प्रगती होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी ही एक कार्यशाळाच ठरली आहे. या कार्यशाळेमधून विद्यार्थ्याना निश्चितच चांगल्या प्रकारचा अनुभव आलेला आहे. लघु, मध्यम व मोठे उद्योग – व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक असणा-या कर्ज सुविधा, कागदपत्रे कशा पध्दतीने उपलब्ध करता येतील, याकरिता केंद्र व राज्य शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत, याबाबतही पुढील वर्षी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच पुढील वर्षी हा उपक्रम सुरु करतांना काही अनुभवी उद्योजकांची व्याख्यानेही आयोजित करण्याचा त्यांचा माणस आहे. तसेच विविध महाविद्यालयांमधून अभ्यास सहली (Study Tour) चे आयोजन दरवर्षी केले जाते, बहुतांश शैक्षणिक सहली या फक्त पर्यटन म्हणून केल्या जातात, परंतु पर्यटनांबरोबरच या विद्यार्थ्यांनी विविध कंपन्यांना भेटी द्याव्यात, तेथील कामकाजाची / व्यवसायाची माहिती घ्यावी अशा पुढील योजना आहेत. भविष्यकाळात प्रवरेने सुरु केलेल्या या Business Expo. चे अनुकरण महाराष्ट्रातील विविध महाविद्यालये / संस्था करतील, त्यामधूनच अनेक नवीन उद्योजक तयार होतील. यातूनच स्थानिक रोजगारांना चालना मिळून भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होण्यास व देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यास मदतच होणार आहे.
“विखे पाटील परिवाराने” नेहमीच समाजासाठी दिशादर्शक असे कार्य केले आहे आणि करीत आहे. उदा: सहकार महर्षी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना उभारुन जगाला ‘सहकाराचा’ मंत्र दिला, त्या धर्तीवर आज संपूर्ण देशात अनेक सहकारी तत्वावरील साखर कारखाने निघाले असून, त्याद्वारे हजारो कोटींची उलाढाल होत आहे आणि लाखो लोकांना नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
“ खाजगी वैद्यकीय व तांत्रिक शिक्षणाचे जनक ” पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रथमच महाराष्ट्रामध्ये खाजगी तत्वावरील पॉलिटेक्निकल, इंजिनिअरींग व वैद्यकीय शिक्षणाचा पाया रोवला. त्यानंतर संपूर्ण भारत देशामध्ये विशेषत: महाराष्ट्रामध्ये अनेक सहकारी साखर कारखान्यांनी खाजगी तंत्रनिकेतने, अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयांमधून तांत्रिक व वैद्यकीय शिक्षणाची सुविधा विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करुन दिली. त्यामधून आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. यामधूनच विविध कंपन्यांसाठी आवश्यक असणारा कुशल कामगार वर्ग तयार होत आहेच, परंतु त्यांच्यामधूनच अनेक विद्यार्थी मोठमोठे कारखानदार, व्यावसायिक तयार झाले आहेत, त्यांनी अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत, त्याबरोबरच वैद्यकीय सुविधाही मोठ्या प्रमाणात निर्माण होण्यास मदत झाली आहे, ही फारच मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. शेतक-यांना शेती बरोबरच जोडधंदा मिळावा, दैनंदिन गरजा भागविण्याकरिता त्यांच्या हातामध्ये सतत पैसा खेळता रहावा म्हणून दुध व्यवसाय वाढीस लागला पाहिजे याकरिता महाराष्ट्रामध्ये प्रथमच पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रवरा दुध संघाची स्थापना करुन तेथे कृत्रिम रेतणधारणेची सुविधा उपलब्ध करुन दिली, त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दुध व्यवसाय वाढीस लागला आहे. आजही महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांपेक्षा अहिल्यानगर जिल्हा व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुधव्यवसाय सुरु आहे. त्यांच्या या सर्वच कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाने डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांना ‘पद्मश्री’ आणि डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांना ‘पद्मभूषण’ या सन्माननिय किताबाने सन्मानित केले आहे, तसेच मा.नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांना महात्मा फुले कृषि विद्यापीठ, आणि वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाने सन्माननीय डी.लिट. (डॉक्टर ऑफ सायन्स) तसेच लोकमत उद्योग समुहाच्या वतीने लंडन येथे पार पडलेल्या लोकमत ग्लोबल इकोनॉमिक्स कन्व्हेंशन 2025 या भव्य सोहळयात ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ हा प्रतिष्ठित पुरस्कार देउन सन्मानित केले आहे.
मा.नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या खात्याचे मंत्रीपद भूषविले, त्या त्या खात्यामध्ये एक दिशादर्शक (Road Map) काम केले आहे. वर्षानुवर्ष भिजत घोंगडे पडलेले निळवंडे धरणाचे रखडलेले काम पूर्ण करुन, मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते उद्घाटन करुन लाभक्षेत्रातील शेतक-यांनी त्याचा लाभही घेण्यास सुरुवात केली आहे. कृषिमंत्री असतांना अनेक योजना राबविल्यामुळे शेतक-यांचे जीवन सुखकर होण्यास मदत होत आहे. खंडकरी शेतक-यांना जमीनी वाटप, वाळु धोरण, दुध उत्पादक शेतक-यांना अनुदान असे एक ना अनेक कामे त्यांनी मार्गी लावलेले आहेत. आताच्या मंत्रीमंडळामध्ये त्यांच्याकडे जलसंपदा खात्याचा कार्यभार सोपविला गेल्यामुळे ते अतिशय आनंदीत झाले आहेत, त्याचे महत्वाचे कारण म्हणजे पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून हाती घेतलेले नदीजोड प्रकल्प असो किंवा घाटमाथ्यावरुन कोकणात वाहून जाणारे पाणी अडविण्याचा प्रश्न असो, या कामाकडे ते विशेषत्वाने लक्ष देत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
विविध शाखांमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी शिकण्या-शिकविण्याबरोबरच समाजोपयोगी संशोधन केले पाहिजे, संशोधन पेपर प्रसिध्द केले पाहिजेत, असा डॉ.सुस्मिता विखे पाटील यांचा आग्रह असतो. संशोधन करतांना विविध बाबींचा अभ्यास करावा लागतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनाही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करता येते, त्यातूनच महाविद्यालयाचा निकाल वाढीसाठी व प्लेसमेंटसाठी चांगला परिणाम दिसून येतो. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्थरावर सेमिनार, कॉन्फरन्स घेण्याकडे त्यांचा कल असतो.
प्रशिक्षण कार्यक्रम (Training Programme) हा प्रत्येक शिक्षक व कर्मचा-यांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. विशिष्ट कौशल्ये, ज्ञान किंवा क्षमता विकसित करण्यासाठी प्रशिक्षण ही एक आवश्यक बाब आहे. याकरिता डॉ.सुस्मिता विखे पाटील या नेहमीच प्रयत्नशिल असतात, त्यांनी मागील 2-3 वर्षांपासून सर्व शिक्षकांकरिता प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन पध्दती आत्मसात करुन, विद्यार्थ्यांची गुणवत्ता व दर्जा सुधारण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होत आहे. यामध्ये शिक्षण क्षेत्रातील छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करुन मार्गदर्शन केले जाते तसेच शिक्षकांची – प्राध्यापकांची कर्तव्ये काय आहेत, याबाबत त्यांना अवगत करुन, त्याप्रमाणे मार्गदर्शन केले जाते, यामधूनच विकसित भारताचे सुजाण नागरिक घडू शकतात अशी त्यांची धारणा आहे.
या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि नेहमीच्या कामाच्या ताण-तणावापासून संस्थेमधील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना एक विरंगुळा मिळावा याकरिता डॉ.सुस्मिता विखे पाटील यांनी सेवकांकरिता कौटूंबिक स्नेहभोजन (Family Get together) आयोजित करुन, यातून अनेक वर्षांपासून एकत्रित कार्यरत असलेल्या सेवकांच्या गाठीभेटी होतच असतात, परंतु सेवकांच्या कुटूंबियांचाही आपापसात जिव्हाळा निर्माण व्हावा, ओळखी व्हाव्यात, एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण व्हावी हा उद्देश त्यामध्ये आहे. यामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा आयोजित करुन एक कौटूंबिक वातावरण तयार होण्यास मदत होत आहे.
शिक्षक व प्राध्यापकांवर एक दबाव असावा, विद्यार्थ्यांना काही अडीअडचणी असल्यास मा.व्यवस्थापन मंडळाशी विद्यार्थ्यांना थेट संपर्क साधता यावा, याकरिता अनेक विद्यार्थी आणि पालकांकडे त्यांनी स्वत:चा मोबाईल नंबर दिलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांना – पालकांना शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित काही अडचणी असल्यास ते डॉ.सुस्मिता विखे पाटील यांच्याशी संपर्क करुन आपल्या अडीअडचणी मांडू शकतात, यामुळे अनेक प्रश्नांच्या मुळाशी जाऊन माहिती मिळण्यास, शिक्षण पध्दतीमध्ये काही बदल करणे आवश्यक असल्यास त्या बाबींचा सखोल अभ्यास करुन त्याप्रमाणे बदल करणे सोपे होते.
विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच संस्कारक्षम बनविले पाहिजे, शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक परंपरेचे जतन व्हावे, भारतीय संस्कृतिची माहिती व्हावी, शिक्षणाबरोबरच माणुसकीही शिकविली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो, याकरिता डॉ.सुस्मिता विखे पाटील नेहमीच प्रयत्नशील असतात. ‘एक गांव एक गपणती’ उपक्रमांतर्गत सर्व शाखांमध्ये गणेशउत्सव, प्रवरा शारदीय नवरात्री उत्सव, ‘रावण दहन’, आणि विशेष उपक्रम म्हणजे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना दिंडीचा आणि वारीचा अनुभव घेता यावा, त्यांच्यामध्ये आध्यात्मिक भाव निर्माण व्हावा याकरिता त्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने जवळपास चाळीस हजार विद्यार्थी व पालकांचा सहभाग असलेला “वारी पंढरीची-ज्ञानगंगा प्रवरेची” हा अतिशय दिमाखदार सोहळा पार पाडला, यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात पंढरीचा सोहळा अनुभवता आला. मा.नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचे नांव अतिशय आदराने घेतले जाते असे मा.ह.भ.प.उध्दव महाराज मंडलिक, मा.आ.श्री.आण्णासाहेब म्हस्के पाटील, मा.सौ.शालिनीताई विखे पाटील, मा.खा.डॉ.सुजयदादा विखे पाटील या सर्वांनी या सोहळ्याचे तोंडभरुन कौतूक केले. मध्यवर्ती स्वयंपाक घर, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करणे या व असे अनेक उपक्रम त्या नेहमीच राबवित असतात.
मोबाईल आणि टी.व्ही.च्या जमान्यामध्ये विद्यार्थ्यांचे खेळाकडे दुर्लक्ष होतांना दिसून येते त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही महत्व दिले पाहिजे, अनेक क्षेत्रांत खेळाडूंसाठी राखीव जागाही असतात, त्यामध्येही विद्यार्थी करिअर करु शकतात, त्यामधूनच अनेक विद्यार्थी देशाच्या संरक्षण क्षेत्रात जाऊ शकतात अशी त्यांची धारणा आहे, मोठमोठ्या शहरांमध्ये खेळाच्या अनेक सोई-सुविधा उपलब्ध असतात, परंतु ग्रामीण भागामध्ये त्याप्रमाणात कमी सोई-सुविधा असतात, याचा विचार करुन डॉ.सुस्मिता विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून नुकतीच “प्रवरा स्पोर्टस अॅकॅडेमीची” स्थापना केली आहे. यामधूनही अनेक खेळाडू आपल्या खेळाची चमक दाखवित आहेत, या अॅकेडमीच्या माध्यमातून अनेक खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवू शकतील, असा विश्वास त्यांना आहे.
डॉ.सुस्मिता विखे पाटील यांची स्मरणशक्ती आजोबांप्रमाणेच इतकी प्रचंड आहे की, मागे 2-3 वर्षांमध्येही काही विषय चर्चिला गेला असल्यास, निर्णय झालेला असल्यास त्या बरोबर त्या निर्णयाची माहिती देतात, कदाचित स्मरणशक्तीचे त्यांच्या कुटूंबला लाभलेले हे वरदानच म्हटले पाहिजे. संस्थेच्या 110 शाखा, चाळीस हजार हून अधिक विद्यार्थी-पालक आणि जवळ जवळ सहा ते सात हजार सेवकांना बरोबर घेऊन आजच्या स्पर्धेच्या युगातील शिक्षणाचे हे शिवधनुष्य लिलया पेलतांना दिसतात, यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाची चुणूक दिसून येते. अशाच प्रकारे समाजाभिमूख आणि विद्यार्थीभिमूख कार्य करण्यासाठी परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो हीच श्री.साईंबाबांचे चरणी प्रार्थना, व प्रवरा परिवाराच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
एकनाथ एन.सरोदे,
(रजिस्ट्रार,पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय, प्रवरानगर)
…
Post a Comment