शिर्डी : गणेश कुंभकर्ण

श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये एक अतिशय गुंतागुंतीची आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी हॉस्पिटलमधील जनरल सर्जन डॉ. अजिंक्य पानगव्हाणे व त्यांच्या टीमने रुग्णाच्या पोटातून तब्बल चार किलो वजनाचा ट्यूमर सर्जरी करून यशस्वीरीत्या काढून मोठे वैद्यकीय यश संपादन केले आहे. निकिता गायकवाड राहणार कोपरगाव वय 27 ह्या रुग्णाला बाळंतपणानंतर गेल्या काही दिवसांपासून पोटात तीव्र वेदना व सूज जाणवत होती. त्या तपासणी करिता श्री साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे डॉक्टर अजिंक्य पानगव्हाणे यांच्या कडे आल्या असता तपासणीनंतर त्यांच्या पोटामध्ये मोठ्या आकाराचा ट्यूमर असल्याचे निदान झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. अजिंक्य पानगव्हाणे व भूलतज्ञ डॉ निहार जोशी यांच्या कुशल नेतृत्वाखाली श्री साईबाबा हॉस्पिटल मधील वैद्यकीय टीमने अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने शस्त्रक्रिया पूर्ण केली. या शस्त्रक्रियेमध्ये श्रद्धा, सबुरी आणि शस्त्रकौशल्याची सांगड झाल्याचे दिसून येत असून सध्या रुग्णाची प्रकृती पूर्णतः स्थिर असल्याकारणाने व समाधानकारकरीत्या सुधारल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना नुकताच डिस्चार्ज दिला. आधुनिक तंत्रामुळे शस्त्रक्रिया कमी वेदनादायक, कमी रक्तस्रावाची आणि जलद पुनर्वसनाची ठरली आहे. श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि अनुभवी डॉक्टरांमुळे परिसरातील रुग्णांना मोठा आधार व दिलासा मिळत आहे.रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टर व संपूर्ण वैद्यकीय टीमचे मनःपूर्वक आभार मानले असून, डॉ. अजिंक्य पानगव्हाणे भूलतज्ञ डॉ निहार जोशी व जनरल सर्जरी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर साहेब(भा प्र से ) यांनी कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post